नाशिक : सुट्टे पैश्यांच्या मोबदल्यात रोकड देण्याच्या व्यवहारात परप्रांतीय दुकलीने हातचलाखीने आठ हजार रूपये हातोहात लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायीकाच्या वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने पोलीसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरज्योतसिंग सतनामसिंग जबल व संदिपकुमार उर्फ दिपा हुकूमचंद कश्यप (रा.दोघे कर्नाल हरियाना) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. नावेद अब्दूलवाईद सिध्दीकी (रा.नानावली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बीवायके कॉलेज जवळील श्रध्दा मॉल मध्ये हा प्रकार घडला. शुक्रवारी (दि.१५) दोघे भामटे मॉलमधील स्केचरर्स या दुकानात कपडे खरेदीच्या बहाण्याने आले होते. आमच्या कडे सुट्टे पैसे असून ते बंधे करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सेल्समन योगेश जगताप यांच्या ताब्यातून त्यांनी ३० हजार रूपये स्विकारले. मात्र काही वेळ बोलण्यात अडकवून त्यांनी सुट्टे पैसे नसल्याचे सांगून पुन्हा पैसे परत केले. जगताप यांनी दिलेले पैसे मोजले असता संशयीतांच्या हातचलाखीचा भांडाफोड झाला. ३० हजारातील आठ हजार रूपये त्यांनी हातोहात लांबविले होते. ही बाब पोलीसांना कळविण्यात आल्याने दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.