दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार
नाशिक : दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील प्रगती शाळा भागात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत चालकाविरूध्द स्व:ताच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. महेश कारभारी शिंदे (३३ रा.महारूद्र हनुमान मंदिराजवळ,श्रमिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी जखमी नवनाथ निवृत्ती भावले (रा.वासाळी ताजि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता. तक्रारदार भावले आणि मृत शिंदे यांच्या दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात दोघे चालक जखमी झाले असून त्यातील शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. शिंदे यांची भरधाव दुचाकी भावले यांच्या मोटारसायकलवर आदळल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
मखमलाबाद – मातोरी मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार
नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत रस्त्याने पायी जाणारा ४८ वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात मखमलाबाद ते मातोरी मार्गावर झाला. याप्रकरणी दुचाकी चालकाविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास भिमराव लोखंडे (४८ रा.लोखंडे मळा,मखमलाबाद) असे अपघातात ठार झालेल्या पादचारीचे नाव आहे. लोखंडे गुरूवारी (दि.१४) मखमलाबाद येथून मातोरी कडे पायी जात असतांना हा अपघात झाला. गोसी पुला जवळ समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ सीएक्स १९५६ दुचाकीने त्यांना धडक दिली. हा अपघात चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोखंडे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पुतण्या समाधान लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वार शरद उत्तम जगताप (५२ रा.ननाशी ता.दिंडोरी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सचिन जगन्नाथ पगार (रा.स्नेहदिप सोसायटी) असे आत्महत्या करणाºया व्यक्तीचे नाव आहे. पगार यांनी शुक्रवारी (दि.१५) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून झोक्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी दिनेशकुमार देवकर यांनी खबर दिल्याने सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.