नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यु झाला. हिंगणवेढे – कोटमगाव मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकी चालकही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी नात्याने सासरा जावई असल्याचे कळते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रंगनाथ मुकलीधर खालकर (रा.नागापूर चांदोरी ता.निफाड) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव असून या अपघातात महादू काळू टिळे (रा.दारणा सांगवी ता.निफाड) हे जखमी झाले आहेत. खालकर हे टिळे यांचे जावई असून गुरूवारी (दि.१४) सासरे टिळे यांच्या एमएच १५ एफजी ३७११ या दुचाकीवर पाठीमागे बसून ते दारणा सांगवीच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. हिंगणवेढे येथील आयुष पेट्रोल पंप भागातून सासरा जावई प्रवास करीत असतांना कोटमगावच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १५ एफ जी ४१७५ या मारूती कारने दुचाकीस समोरून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले जावई खालकर यांचा मृत्यु झाला असून सासरे टिळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नवनाथ टिळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरूध्द पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
…….