क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ४१ हजाराची फसवणूक
नाशिक : क्रेडिट कार्डचे लिमीट वाढवून देण्याचे सांगून भामट्यांनी तरूणाच्या कार्डची गोपनिय माहिती मिळवीत परस्पर ४१ हजार रूपये ऑनलाईन काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब मधूकर आव्हाड (रा. श्रीरामनगर,आडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. आव्हाड स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरतात. गेल्या शुक्रवारी (दि.१) ०९१०११३९०२०२०२ व ९१६३९९६६२८७२ या क्रमांकावरून भामट्यांनी आव्हाड यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी क्रेडिट कार्डचे लिमीट वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने आव्हाड यांनी कार्डची गोपनिय माहिती भामट्यांना दिली. यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४० हजार ४७२ रूपये परस्पर ऑनलाईन काढण्यात आले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
महिलेच्या रोकडसह दागिण्यांवर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : खरेदीसाठी बाजार पेठेत गेलेल्या महिलेची पिशवी कापून चोरट्यांनी पाकिट पळविल्याची घटना मेनरोड भागात घडली. पाकिटात दहा हजाराच्या रोकडसह दागिणे असा सुमारे ७० हजार रूपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री योगेश्वर गामणे (रा. आरटीओ समोर,पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गामणे यांच्या आई मंगळवारी (दि.१२) खरेदीसाठी मेनरोड भागात गेल्या होत्या. हुंडिवाला लेन येथील रूपमिलन मॅचिंग सेंटर परिसरात त्या खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी धारदार वस्तूने कापून पाकिट चोरून नेले. पाकिटात दहा हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस नाईक काठे करीत आहेत.