बेकायदा मद्यविक्री तिघांना अटक
नाशिक: टाळेबंदीत बेकायदा मद्यविक्री करणा-या तिघांना वेगवेगळया ठिकाणाहून पोलीसांनी अटक केली. संशयीत आपल्याच घरात दारू विकतांना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ६ हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आाहे. याप्रकरणी पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आाहेत.
शिवाजी बाबुराव जाधव (६५, रा. लक्ष्मण नगर, पेठरोड, पंचवटी), पांडुरंग राजाराम गोळे (५७, वाल्मिकनगर, पंचवटी) व बाबा आण्णा शिंदे (वैदुवाडी, म्हसरूळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शिवाजी जाधव हा आपल्या राहते घरात देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारून जाधव यास ताब्यात घेतले आहे. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार कुलकर्णी अधिक तपास करत आहेत.तर गोळे व शिंदे हे म्हसरूळ गावातील कोळीवाडा येथे मद्यविक्री करीत असल्याची महिती मिळाल्यावरून वरिष्ठ निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…..
दुचाकी झाडावर आदळून एक ठार
नाशिक: भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला हा अपघात औद्योगीक वसाहतीतील ज्योती हाऊस भागात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राकेश सुर्यकांत बच्छाव (४०,रा. जाधव टाऊनशिप,सातपुर अंबड लिंकरोड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बच्छाव हे रविवारी (दि.९)आपल्या दुचाकीने औद्योगीक वसाहतीतून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आदळली. हा अपघात ज्योती हाऊस भागात घडला. या घटनेत बच्छाव गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
….
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
नाशिक: राहते घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ज्ञानेश्वर बाबुराव अकंद (५६, रा. दसकगाव, जेलरोड) असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे. अकंद यांनी राहते घरी रविवारी सकाळी छतास दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय आधिकार्यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
……
रंगकाम करताना पडून मजुर ठार
नाशिक: इमारतीचे रंगकाम करत असताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.९) दुपारी घडली. रविंद्र गणपत निसार (२४, रा. भोसला मिलिटरी स्कुल जवळ, गंगापूर रोड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसला मिलीटरी स्कुलजवळ नवीन बांधकाम झालेल्या इमारतीचे रंगकाम सुरू असताना तोल जाऊन निसार हा खाली पडला. त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
……