हिरावाडीत दुचाकीच्या डिक्कीतून साडे तीन लाख लंपास
नाशिक : घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी साडे तीन लाख रूपये असलेली बॅग हातोहात लांबविल्याची घटना हिरावाडीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र बाळाजी खांडेकर (रा.सहजानंद पार्क,शक्तीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खांडेकर व्यापारी असल्याचे कळते. सोमवारी (दि.११) रात्री व्यवसायाच्या पैश्यांची बॅग अॅक्टीव्हा दुचाकीच्या एमएच १५ डीवाय १२५२ डिक्कीत ठेवून ते आपल्या घरी पोहचले. जेवण आटोपून घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीतील पैश्यांची बॅग काढण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या अॅक्टीव्हाची डिक्की उघडून बॅगेतील ३ लाख ४० रूपयांची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल कासर्ले करीत आहेत.
न्यायालयात पोलीसास धक्काबुक्की
नाशिक : दुचाकी पार्क करण्याच्या वादातून पोलीसास शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार जिल्हा न्यायालय आवारात घडला. याप्रकरणी तिघांविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एका मुंबईच्या महिलेचा समावेश आहे. अब्दूल लतीफ यासीम कोकणी,अन्वर हुसेन यासीम कोकणी (रा.दोघे कोकणीपूरा) व रूबिना जावीद आबुजी (रा.भिवंडी) अशी पोलीसास धक्काबुक्की करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले सहाय्यक उपनिरीक्षक कैलास जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव आणि त्यांचे सहकारी मंगळवारी (दि.१२) जिल्हा न्यायालयात सेवा बजावत असतांना ही घटना घडली. प्रवेशद्वार क्रमांक १ नजीक अॅक्टीव्हा (एमएच १५ एफएफ १७६३) वर आलेल्या संशयीतांनी पार्कि ग मध्ये आपले वाहन व्यवस्थीत पार्क केले नाही त्यामुळे हा वाद झाला. येणा-या जाणा-या वाहनांना अडथळा निर्माण होईल अशास्थितीत दुचाकी पार्क करण्यात आल्याने पोलीस कर्मचा-यांनी कोकणी बंधूना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळ करीत पोलीसाना धक्काबुक्की केली. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.