नाशिक : नातवाला शिकवणीस सोडून घराकडे परणा-या महिलेच्या गळयातील पोत कारमधून आलेल्या भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मखमलाबाद रोड भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सिनेस्टाईल पाठलाग करून गुजरात राज्यातील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत कारसह सोन्याचे पोत असा सुमारे साडे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
जयसिंग हरीराम यादव (२५),पंकज परशुराम यादव (२०),कुलदिप भगवानदिप यादव (२०) व संदिप उमाकांत यादव (२५ रा.सिल्वासा – बलसाड राज्य गुजरात) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. मखमलाबाद रोड भागातील
सुमन नारायण सोमवंशी (६५ रा.शिंदेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवंशी या रविवारी (दि.१०) सकाळी नातवास शिकवणीसाठी सोडण्यास गेल्या होत्या. शिवकृपा क्लासेस येथे नातवास सोडून त्या मखमलारोडने घराकडे परतत असतांना ही घटना घडली. समोरून कारमधून आलेल्या भामट्यानी काही कार अंतरावर आपले वाहन थांबवून ही जबरीचोरी केली होती. एकाने कारखाली उतरत पायी जाणा-या सोमवंशी यांच्या गळय़ातील सुमारे १ लाख रुपए किमतीची सोन्याची पोत ओरबाडून कारमधून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशान्वये पंचवटी पोलीस कामाला लागले होते. वरिष्ठांसह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ गाठून चार मजली इमारतीला लावलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून पाठलाग करीत कारसह संशयीतांना हुडकून काढले. रूख्मीनी मंगल कार्यालयामार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नातील संशयीतांच्या भरधाव कारला पिटर मोबाईलवरील चालक अंबादास जाधव यांनी आपले वाहन आडवे लावल्याने चैनस्नॅचरांची ही टोळी पकडण्यात यश आले. संशयीतांच्या ताब्यातून सोन्याची पोत व गुह्यात वापरण्यात आलेली कार जीजे १५ सीके ९१८५ असा सुमारे साडे तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक साखरे,सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, उपनिरीक्षक राम घोरपडे, हवालदार अंबादास जाधव व शिपाई विलास जास्वाल आदींच्या पथकाने केली.