पेट्रोलपंपावर तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला
नाशिक : वाद मिटविण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरूणावर त्रिकुटाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू पोपट खाडे (२१ रा.मुस्कान प्लाझा,शिवाजीनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खाडे शनिवारी (दि.९) रात्री कार्बन नाका भागात गेला होता. पूजा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणातून अज्ञात तीन जण गणेश नामक कामगाराशी वाद घालत होते. यावेळी खाडे यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. पेट्रोल पंपा बाहेर थांबलेल्या त्रिकुटाने खाडे बाहेर पडताच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत खाडे जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
वृध्देसह तरूणाची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून, रविवारी (दि.१०) वेगवेगळय़ा ठिकाणी राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यात ६० वर्षीय वृध्देसह ३२ वर्षीय युवकाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैला मनोहर जाधव (६० रा.जामनेररोड,भुसावळ जि.जळगाव) या वृध्देने शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास गोदाघाटावरील रामकुंड भागात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. परिसरातील नागरीकांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता रविवारी त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक वाघमारे करीत आहेत. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. सुदर्शन धर्मराज बर्वे (३२ रा.महालक्ष्मी धाम सोसा.महालक्ष्मीनगर) या तरूणाने रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी संदिप बर्वे यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.