क्रिकेट खेळतांना चक्कर येवून पडल्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यु
नाशिक : क्रिकेट खेळतांना चक्कर येवून पडल्याने १५ वर्षीय बालकाचा मृत्यु झाला. ही घटना सिडकोतील रणभूमी क्रिकेट मैदानावर घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. श्रेयश सुधीर ढेरे (रा.कालिका पार्क,आण्णा पाटील शाळे मागे) असे मृत बालकाचे नाव आहे. श्रेयश ढेरे हा बालक रविवारी (दि.१०) नेहमीप्रमाणे परिसरातील उंटवाडी भागात असलेल्या रणभूमी क्रिकेट मैदानावर खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळत असतांना अचानक तो चक्कर येवून जमिनीवर कोसळला होता. मित्र आणि वडिलांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बोंबले करीत आहेत.
मखमलाबाद रोडवर महिलेची पोत खेचली
नाशिक : नातवाला शिकवणीस सोडून घराकडे परणा-या महिलेच्या गळयातील पोत भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मखमलाबाद रोड भागात घडली. विशेष म्हणजे एरवी दुचाकीवरील भामटे चेनस्नॅचिंग करीत असतांना आता कारमधून आलेल्या भामट्यांनी हा प्रकार केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन नारायण सोमवंशी (६५ रा.शिंदेनगर,मखमलाबाद रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवंशी या रविवारी (दि.१०) सकाळी नातवास शिकवणीसाठी सोडण्यास गेल्या होत्या. मखमलारोडने त्या घराकडे परतत असतांना शिवकृपा क्लासिक बिल्डींग भागात ही घटना घडली. पाठीमागून कारमधून आलेल्या भामट्यानी कार थांबविली. यावेळी एकाने कारखाली उतरत पायी जाणाºया सोमवंशी यांच्या गळय़ातील सुमारे १ लाख रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून कारमधून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.