नाशिक : कर्जदारांकडून परस्पर मासिक हप्त्याच्या रकमा गोळा करून वसूली अधिका-याने फायनान्स कंपनीला १ लाख २१ हजार रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीताने अचानक काम थांबविल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक राजू खरात (रा.मगर मळा,साईनगर एकलहरा रोड) असे ठकबाज वसूली अधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी श्रीराम सिटी युनियन फायनान्सचे पंकज घुगे यांनी तक्रार दाखल केली आहे. खरात श्रीराम फायनान्स या कंपनीत वसूली अधिकारी होता. २२ सप्टेंबर २०१८ ते ८ ऑक्टोबर २०२१ या काळात त्याने कर्जदारांकडून मासिक हप्त्याची रक्कम आणि दंड अशी १ लाख २१ हजार ७०० रूपयांची परस्पर वसूली केलेली असतांनाही भरणा केला नाही. या रकमेचा त्याने अपहार केला असून अचानक काम सोडल्याने हा प्रकार समोर आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार समोर येताच कंपनीने त्यास नोटीसा पाठविल्या असता त्याने विलास गांगुर्डे या जामिनदाराच्या मध्यस्थीने त्याने कंपनीत येवून पैसे भरण्याची हमी दिली होती. परंतू अनेक महिने उलटूनही पैसे न भरण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.