नाशिक : प्रेमविवाह केल्याने एकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगर भागात घडली. या घटनेत धारदार शस्त्राने तरूणावर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय आव्हाड,अक्षय आव्हाड, गामणे व अजू भोंगळ अशी तरूणास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश बबन कु-हे (२५ रा.आसरा चौक,मोरवाडी गाव) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. कु-हे या तरूणाने नुकताच प्रेमविवाह केला असून गुरूवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास तो जेवणाचे पार्सल घेण्यासाठी सिंहस्थनगर भागातून जात असतांना ही घटना घडली. केबल ऑफिस समोर चौघांच्या टोळक्याने त्यास गाठून बेदम मारहाण केली. या घटनेत त्याच्यावर लोखंडी वस्तू आणि धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक महाजन करीत आहेत.