टकलेनगरला पावणे दोन लाखाची घरफोडी
नाशिक : टकलेनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर पांडूरंग सोनार (रा.गंधर्व बंगला,ओम सोसा.) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनार कुटूंबिय १ ऑगष्ट ते ७ ऑक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ६० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ७० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.
तडिपार गोड्या गायधनी जेरबंद
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना राजरोसपणे शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई शिखरेवाडी भागात करण्यात आली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पराग उर्फ गोट्या राजेंद्र गायधनी (रा.पुरूषोत्तम शाळेजवळ,ना.रोड) असे अटक केलेल्या तडिपार गुंडाचे नाव आहे. गोट्या गायधनी याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी त्यास एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.८) तो शिखरेवाडी मैदान परिसरात आल्याची माहिती मिळाली. उपनगर पोलीसांनी त्यास जिमखान्याच्या प्रवेशद्वार भागात बेड्या ठोकल्या असून,याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल टिळेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार गोडसे करीत आहेत.