काठेगल्लीत भरदिवसा चोरी; ४० हजाराचे अलंकार केले लंपास
नाशिक : काठेगल्लीत भरदिवसा झालेल्या चोरीत चोरट्यांनी सुमारे ४० हजाराचे अलंकार चोरून नेली. घर उघडे असल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपमाला आशिष चव्हाण (रा.धुमकेतू अपा.कॅमल हाऊस शेजारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण कुटूंबिय सोमवारी (दि.४) सकाळच्या सुमारास आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही चोरी झाली. घराचे दार उघडे असल्याची संधी साधत घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे ४० हजार ४०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
वाहनाचे नुकसान करीत टोळक्याने एकास बेदम मारहाण
नाशिक : घरासमोर पार्क केलेल्या वाहनाचे नुकसान करीत टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना शिंगाडा तलाव भागात घडली. जुन्या वादातून ही घटना घडली असून, या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला आहे. तसेच त्याच्या हातातील सोन्याचे ब्रॅसलेट आणि मोबाईल गहाळ झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम आहिरराव, कल्पेश वाव्वळ, अभिषेख वाव्वळ आणि वृषाल खंडेराव (रा.सर्व शिंगाडा तलाव) अशी तरूणास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी जय राजेंद्र बच्छाव (२० रा.फायर ब्रिगेड समोर,शिंगाडा तलाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. बच्छाव मंगळवारी (दि.५) रात्री परिसरातील दत्त मंदिर चौकात गेला असता ही घटना घडली. संशयीतांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यास दमदाटी करीत लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यावेळी संशयीत टोळक्याने बच्छाव यांच्या कारचे नुकसान केले असून या झटापटीत त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रॅसलेट आणि मोबाईल गहाळ झाला आहे. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
………..