नाशिक : मालक सलूनमध्ये गेल्याची संधी साधत कारचालकाने पंधरा लाखांची रोकड असलेली बॅग घेवून पोबारा केल्याची घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास उत्तमराव मोकासे (मुळ रा.शिपोच जि.औरंगाबाद हल्ली उत्तमनगर, सिडको) असे मालकाची रोकड घेवून पोबारा करण-या संशयीत कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अली गुलाम हुसैन सुराणी (रा.शिंगाडा तलाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. सुराणी यांचे शहरात हॉटेल,ट्रान्सपोर्ट आणि वजन काट्याचा व्यवसाय आहे. रविवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास ते संशयीत चालकास सोबत घेवून वेगवेगळया ठिकाणी असलेल्या व्यवसायाची रोकड जमा करून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. लॅपटॉप बॅगमध्ये रोकड घेवून दोघे कॅनडा कॉर्नर मार्गे इनोव्हा वाहनातून प्रवास करीत होते. कॅनडा कॉर्नर येथील वेलडाऊन सलून येथे सुराणी सेव्हींग करण्यासाठी थांबले असता संशयीताने रोकड असलेली बॅग लांबविली. सलून दुकानात वेळ लागणार असल्याने मालकाने घरी जाण्यास सांगितल्याने संशयीताने कार लॉक करून चावी दिली मात्र पैश्यांची बॅग लांबविली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकविपुरे करीत आहेत.
वेगवेगळया भागात राहणा-या तीघांनी केली आत्महत्या
नाशिक : शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी (दि.६) वेगवेगळया भागात राहणा-या तीघांना गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली,गंगापूर आणि सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. जुने नाशिक भागातील जुनैद रौप खान (३० रा.राजबी हॉटेल मागे,बागवानपुरा) या युवकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लाकडाच्या बल्लीला कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बैरागी करीत आहेत. दुसरी घटना सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. विकास सुभाष सोनवणे (२५ रा.मनपा शाळे समोर) या युवकाने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी अॅगलला वायर बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. शेजारी असलम शेख यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत. तर धनंजय रामकेवल शर्मा (४५ रा.जगतापवाडी,सातपूर) यांनी बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये छताच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. शर्मा यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यातल आली असून अधिक तपास पोलीस नाईक कोरडे करीत आहेत.