डेबिट कार्डची आदला बदल, ४० हजार परस्पर काढले
नाशिक : मदतीच्या बहाण्याने डेबिट कार्डची आदला बदल करीत भामट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ४० हजार रूपयांची रोकड परस्पर काढून घेतल्याची घटना महामार्गावरील जत्रा हॉटेल चौकात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललीत हिरामण जाधव (रा.महालक्ष्मीनगर,जत्रा हॉटेल चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव गेल्या २९ सप्टेंबर रोजी पैसे काढण्यासाठी परिसरातील जत्रा हॉटेल चौकात गेले होते. आडगाव शाखेच्या एसबीआय एटीएम बुथमध्ये ते पैसे काढत असतांना ही घटना घडली. पैसे काढण्यासाठी एकाने मदतीचा बहाणा करून डेबिट कार्डची आदला बदल केली. त्यानंतर भामट्याने जाधव यांच्या बँक खात्यातील ४० हजार रूपये परस्पर काढून घेतले अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.
मखमलाबाद येथे चोरीटी घटना; ७७ हजार ५०० रूपयाचा ऐवज चोरीला
नाशिक : उघड्या घरात शिरून चोरट्यांनी दागिण्यांसह टिव्ही आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्याची घटना मखमलाबाद येथे घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शामकांत चंद्रकांत थविल (रा.शिवकृपा बंगला,वेदांत बिल्डींग समोर,म.बाद) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. थविल कुटूंबिय सोमवारी (दि.४) सकाळच्या सुमारास आप आपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी घरातील टिव्ही,सोनसाखळी,सोन्याचे मंगळसुत्र,चांदीची मुर्ती व स्मार्ट वॉच असा सुमारे ७७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार पवार करीत आहेत.
दोन ठिकाणी चेनस्नॅचिंगच्या घटना
नाशिक : शहर परिसरात चेनस्नॅचरांचा धुमाकूळ सुरू असून मंगळवारी (दि.५) दिवसभरात दोन ठिकाणी चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. वेगवेगळया भागात रस्त्याने पायी जाणा-या दोन महिलांच्या गळयातील दागिणे दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले असून याप्रकरणी गंगापूर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेखा प्रकाश शिवले (४२ रा.सिंधू पॅलेस अपा.पंपीग स्टेशन) या मंगळवारी रात्री फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. गंगापूररोड भागातून फेरफटका मारून त्या पंपीग स्टेशन येथील ऋतुजा सारीज दुकानासमोरून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील ७० हजार रूपये किमतीचे सिंगल पदरी मंगळसुत्र हिसकावून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत. दुसरी घटना श्री हरी नारायण कुटे मार्गावर घडली. याप्रकरणी सुजाता दिपक निखाडे (२९ रा.कलानगर,दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. निखाडे या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आपले कार्यालयीन काम आटोपून श्री हरी कुटे मार्गाने पायी जात असतांना ही घटना घडली. बॉक्स पार्क टर्फ समोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख १८ हजार ८४९ रूपये किमतीचे चेन पॅटर्न मणी मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.