पेट्रोलपंपाची डिलरशिप देण्याचा बहाण्याने आठ लाखाला गंडा
नाशिक : एचपीसीएल कंपनीचा अधिकारी असल्याचे ऑनलाईन भासवून पेट्रोलपंपाची डिलरशिप देण्याचा बहाण्याने भामट्यांनी एकास सुमारे आठ लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून ही फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय परशराम कदम (रा.शाह गार्डन रेसि.विजयनगर देवळाली कॅम्प) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कदम यांना पेट्रोलपंपाची डिलरशिप मिळवायची होती. त्यासाठी त्यांचा ऑनलाईन शोध सुरू असतांना भामट्यांनी ही संधी साधली. सोशल साईटवरून मेल अॅड्रेस मिळवित भामट्यांनी कदम यांच्याशी संपर्क साधला होता. ९ फेब्रुवारी ते १३ जुलै २०२१ दरम्यान भामट्यांनी एचपीसीएल कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून कदम यांना येस बँकेच्या बनावट खात्यात सुमारे ७ लाख ७९ हजार २०० रूपये भरण्यास भाग पाडले. अनेक महिने उलटूनही डिलरशिप न मिळाल्याने कदम यांनी चौकशी केले असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.
…..
महिलेच्या पर्स लांबविली
नाशिक : खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत भामट्या महिलेने एका महिलेच्या पर्स मधून हातोहात लांबविल्याची घटना रविवार कारंजा भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पा देविदास जाधव (रा.अमृतधाम मागे.पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव या मंगळवारी (दि.५) खरेदीसाठी रविवार कारंजा भागात आल्या होत्या. खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधून अज्ञात भामट्या महिलेने त्यांच्या पिशवीतील पर्स मधून दहा हजाराची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास पोलीस नाईक खोडे करीत आहेत.