नाशिक : घरात घुसून एका सराईताने मुलास मारहाण करीत कोयत्याचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना पेठरोड भागात घडली. धारदार कोयता हातात घेवून महिलेच्या घरातून बाहेर पडलेल्या संशयीताने परिसरात दहशत निर्माण करीत पुन्हा भाजीपाला आणि किराणा दुकान व्यावसायीक महिलांकडे मद्यपान करण्यासाठी पैश्यांची मागणी करून नासधुस करीत त्यांचाही विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत. अनिल दत्तू पवार उर्फ आन्या सांड (रा.सुदर्शन कॉलनी,पेठरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पेठरोड भागातील पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि तिचा मुलगा रविवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असतांना संशयीताने घराबाहेर येवून नाहक शिवीगाळ केली. यावेळी मायलेकांनी घराचा दरवाजा बंद केला असता संतप्त संशयीताने कोयत्याने दरवाजा तोडून बळजबरीने घरात प्रवेश केला. यावेळी मुलास बेदम मारहाण केली. याप्रसंगी महिला आपल्या मुलाच्या बचावासाठी धावून गेली असता संशयीताने कोयत्याचा धाक दाखवून तिचा विनयभंग केला. यानंतर हातात कोयता घेवून घराबाहेर पडलेल्या संशयीताने मी या भागातील भाई आहे असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच रस्त्याने हातगाडीवर भाजीपाला विक्री करणा-या महिलेकडे मद्यपानासाठी पैशांची मागणी करीत तिचाही विनयभंग केला. यानंतर त्याने काही अंतरावर असलेल्या किराणा दुकानात घुसून व्यावसायीक महिलेकडे पैश्यांची मागणी केली मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयीताने शिवीगाळ करीत काऊंटरला लाथ मारून दुकानात जबरदस्तीने घुसून नासधूस केली. या घटनेत संशयीताने व्यावसायीक महिलेचा विनयभंग करीत तिचे कपडे फाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयीताविरूध्द खूनासह विविध गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात त्याची मोठी दहशत असल्याचे बोलले जाते.पोलीसांनी वेळीच दखल घेवून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.