नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून कारसह वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव,मुंबईनाका,इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरज अनिल गाडे (रा. हायलॅण्ड टॉवर,स्वामी समर्थ नगर,जत्रा हॉटेल जवळ) यांची डिझायर कार एमएच १६ सीक्यू २३११ रविवारी (दि.३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत. दुसरी घटना पखालरोडवरील विधातेनगर भागात घडली. फरहान हखीमुद्दीन शेख (रा.प्रभू ग्रीन्स अपा.समोर विधातेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफ के २३३८ गेल्या २७ आॅगष्ट रोजी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भोये करीत आहेत. सिडकोतील गजानननगर भागात राहणारे संतोष वामनराव घुले हे रविवारी (दि.३) रात्री महामार्गावरील काका का धाबा येथे गेले होते. सर्व्हीसरोडवर पार्क केलेली त्यांची एमएच १५ सीझेड ८७१४ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. तर याच भागातील लई भारी हॉटेल समोर पार्क केलेली बुलेट एमएच १५ जीटी १५५७ चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी बाळासाहेब मुरलीधर व्हसाळे (रा.कॅनडा कॉर्नर) यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास अनुक्रमे हवालदार कोकाटे व निकम करीत आहेत. तर सिडकोतील किशोर भानुदास झांबरे (रा.मर्चंट बँके शेजारी,उत्तमनगर) यांची मोटारसायकल एमएच १५ एफडब्ल्यू ४२९७ गेल्या शुक्रवारी (दि.१) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक महाजन करीत आहेत.