उंटवाडीरोडवरील संभाजी चौकात घरफोडी; चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविला
नाशिक : उंटवाडीरोडवरील संभाजी चौकात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय नितीन जळगावकर (रा.गायत्री अपा.महात्मानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही घटना रविवारी (दि.३) रात्री संभाजी चौकातील एनडीए टॉवर या इमारतीतील फ्लॅट नं. ६ मध्ये घडली. जळगावकर कुटूंबिय महात्मानगर येथील घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅच लॉक कश्याने तरी तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे २ लाख ६१ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांचा ७० हजाराच्या अलंकारावर डल्ला
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील वजनकाटा भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या अलंकारावर डल्ला मारला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता बबनराव रायकर (रा.कचरू फडोळ मळा,वजन काटा समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रायकर कुटूंबिय रविवारी (दि.३) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ७० हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
मिरचीपुड टाकून दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र लांबविले
नाशिक : इमारतीच्या आवारात वृध्द महिलेच्या अंगावर मिरचीपुड टाकत दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना महामार्गावरील महालक्ष्मीनगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा रामचंद्र येवले (६८ रा.जानकी निवास महालक्ष्मीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. येवले या सोमवारी (दि.४) सकाळच्या सुमारास बिल्डींगच्या पार्किंगमध्ये आल्या असता ही घटना घडली. इमारतीच्या आवारातील पार्किंगकडून सोसायटीच्या कार्यालयाकडे पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने पार्किंगमध्ये प्रवेश करीत त्यांच्या अंगावर मिरचीपुड टाकून गळय़ातील सुमारे ८० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.