तोल जावून पडल्याने सिडकोतील एकाचा पाण्यात बुडून मृत्यु
नाशिक : हातपाय धुवत असतांना तोल जावून पडल्याने सिडकोतील एकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही घटना गोदाघाटावर घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रावसाहेब संतोष महाजन (३६ रा.थिमपार्क,आरटी सोसा.गणेश कॉलनी,उत्तमनगर) असे पाण्यात बुडून मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाजन रविवारी (दि.३) गोदाघाट परिसरात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते रामकुंड येथे हातपाय धुण्यासाठी गेले असता ही घटना घडली. हातपाय धुवत असतांना अचानक तोल जावून ते पाण्यात बुडाले होते. ही बाब निदर्शनास येताच जीव रक्षकांनी त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
….
कारची काच फोडून म्युझिक सिस्टीम चोरी
नाशिक : पार्क केलेल्या स्कोडा कारची काच फोडून चोरट्यांनी म्युझिक सिस्टीम आणि एसी युनिटचे जाकिट असा सुमारे १३ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना महात्मानगर येथे घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदिश कांताप्रसाद मिश्रा (रा.सुयश अपा.जनसेवा बँके शेजारी,महात्मानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिश्रा यांची स्कोडा रॅपिड कार एमएच १५ जीए ९४४५ गुरूवारी (दि.२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चालकाच्या सिटामागील खिडकीची काच फोडून म्युझिक सिस्टीम आणि एसी युनिटचे जाकिट असा सुमारे १३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.