नाशिक : आर्थिक देवाण घेवाणीतून दोघांनी एकास मारहाण करीत कोयत्याने हल्ला केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील नवनाथनगर भागात घडली. या घटनेत ३० वर्षीय तरूण जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळा भालेराव व त्याचा साथीदार अशी संशयीताची नावे आहेत. याप्रकरणी युवराज अशोक सांगळे (रा.मारूती संकुल,दत्तनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सांगळे आणि परिचीत असलेल्या भालेराव यांच्यात आर्थिक व्यवहार आहे. सांगळे रविवारी (दि.३) नवनाथनगर येथील प्रणव स्टँपीग मागील रेणूका इंजिनिअरींग भागात असतांना संशयीत दोघांनी त्यांना गाठले. यावेळी भालेराव यांनी राहिलेल्या पैश्यांची मागणी केली असता सांगळे यांनी संध्याकाळ पर्यंत देण्याची ग्वाही दिली असता ही घटना घडली. संतप्त भालेराव याने शिवीगाळ करीत सांगळे यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली तर त्याच्या साथीदाराने धारदार कोयत्याने सांगळे यांच्या डोक्यात व पायावर वार करून जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.