इलेक्ट्रीक शॉक लागल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने २५ वर्षीय तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना नांदूरनाका भागातील निसर्ग नगर येथे घडली. पत्र्याच्या घरास करंट उतरल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुभाष रावसाहेब गायकवाड (२५ रा.ओमकार किराणा मागे,निसर्गनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. गायकवाड महाराजा बॅण्ड समोरील पत्र्याचे शेड असलेल्या घरात राहतात. रविवारी (दि.३) दुपारच्या सुमारास पत्र्याचा घरातील इलेक्ट्रीक वायर कट झाल्याने करंट उतरला होता. अनावधानाने गायकवाड यांचा पत्र्यास धक्का लागल्याने त्यांना शॉक बसला. कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.
…….
दोन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून नुकत्याच दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा भागातील दिपक श्रावण जाधव (रा.ज्ञानदिप बंगला) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव २३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी मुंबईनाका परिसरातील साई केअर हॉस्पिटल येथे गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ डीजी ०७०५ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत. दुसरी घटना कलानगर भागात घडली. बाळकृष्ण भाऊराव वाटपाडे (रा.श्री काटेश्वराय सोसा.कलानगर) यांची एमएच १५ एफडी ६०४७ दुचाकी गेल्या १७ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बरेलीकर करीत आहेत.