नाशिक : अॅक्युमेन व गुडवेल या शेअर मार्केट कंपनीचा ब्रोकर असल्याचे भासवून एकाने गुंतवणुकदारांना ६४ लाखाला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक न करता संशयीताने रोकड परस्पर हडप केली असून काही रकमा परत केल्या आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल शंकर गौडा पाटील (३५ रा.बेळगाव,कर्नाटक) असे गंडा घालणा-या संशयीत ब्रोकरचे नाव आहे. याप्रकरणी संजय सदानंद बिन्नर (रा.भगूर,देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत पाटील याने जनरल वैद्यनगर भागातील एका सोसायटीत आपले कार्यालयीन थाटून हा गंडा घातला आहे. तक्रारदार बिन्नर यांच्यासह सुमारे १३ जणांची या प्रकारात फसवणुक झाली आहे. अॅक्युमेन व गुडविल या दोन शेअर मार्केट कंपनीचा ब्रोकर असल्याचे प्रमाणपत्र दाखवून भामट्याने ही फसवणुक केली आहे. १ नोव्हेंबर २०२० ते ५ एप्रिल २०२१ या काळात संशयीताने गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करून ७५ लाख ४५ हजाराची रक्कम स्विकारीत गुंतवणुक केल्याचे भासविले होते. मात्र गुंतवणुक न करता सदर रकमेचा त्याने अपहार केला. ही बाब निदर्शनास येताच गुंतवणुकदारांनी तगादा लावला असता त्याने ११ लाख एक हजार ५९७ रूपयांचा परतावा केला. मात्र त्यानंतर टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून ६४ लाख ४३ हजार ४०३ रूपयांची फसवणुक केल्याचे फिर्यादी बिन्नर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास निरीक्षक चंद्रकात आहिरे करीत आहेत.