नाशिक – नाशिक : आडगाव शिवारातील कोणार्क नगर भागात चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न पोलीसांनी उधळून लावला. पोलीसांची चाहूल लागताच चोरटे आपले वाहनसह पिस्तूल आणि दरोड्याचे साहित्य सोडून पसार झाले असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलीसांच्या गस्ती पथकामुळे दरोड्याचा अनर्थ टळला. सोमवारी (दि.२७) मध्यरात्री गस्तीवरील पोलीस आपली सेवा बजावत असतांना महामार्गाने कोणार्क नगर भागात भरधाव शिरलेल्या डीएल ३ सीबीझेड ६३०७ या हुंडाई कंपनीची वेरणा कारचा पोलीसांना संशय आला. कारच्या नंबर प्लेट वरील नंबरवरून पोलीसांनी पाठलाग केला असता दरोडेखोरांना पोलीसांची चाहूल लागल्याने त्यांनी कार गार्गी मेडिकल समोर पार्क करून पोबारा केला. पोलीसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये कावठी कट्टा,मोबाईल,दरोड्याचे साहित्य तसेच पाकिट मिळून आले. पाकिटातील कागदपत्राच्या आधारे कार रफत अली यांच्या नावे असून त्याच नावाचे आधार कार्ड आणि महत्वाचे कागदपत्र मिळून आले आहेत. उत्तर प्रदेश येथील आयसीआयसीआय बँकेचे फास्ट टॅग चिटकविलेले आहे. परिसरातील सीसीटिव्हीच्या शोधात कारमधून पाच संशयीतांनी पोबारा केल्याचे समोर आले असून या कागदपत्राच्या आधारे परप्रांतीय दरोडेखोर असल्याचा प्राथमिक अंदाज असून राजाराम भुमीराज निवासी यांच्या नावाचा नोटरी बॉण्ड आणि कार रिपेअरींगची पावती मिळून आली आहे. कार,रिव्हाल्वर व दरोड्याचे साहित्य असा सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून याप्रकरण पोलीस कर्मचारी अमोल देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.