– शहरात वावरणा-या तडीपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावरणा-या एका तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शालिमार जुने नाशिक भागातील कथडा परिसरात करण्यात आली. संशयीत आडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुह्यात फरार होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर अनिल कुमावत (२८ रा.कुंभारवाडा,शितळा देवी मंदिरामागे) असे अटक केलेल्या तडीपाराचे नाव आहे. कुमावत यास गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षा साठी शहर आणि जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.२७) तो शालिमार भागात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलीसांनी त्यास जेरबंद केले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सागर निकुंभ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास आडगाव पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. आडगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल असून त्यात तो फरार होता. ही कारवाई भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक संभीजा निंबाळकर व दिलीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,पोलीस कर्मचारी जितेंद्र पवार,सागर निकुंभ आदींच्या पथकाने केली.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र ओरबडले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र एका भामट्याने ओरबडून नेले. ही घटना गंगापूररोडवरील काळेनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोमल दिलीप हिंगमिरे (रा.श्रीरंगनगर,पंपीग स्टेशन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हिंगमिरे या रविवारी (दि.२६) काळे नगर भागात गेल्या होत्या. रात्री पाईपलाईन रोडने त्या आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. आनंदी आंगन जागिंग ट्रॅक भागातून त्या पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या अनोळखी भामट्याने त्यांच्या गळयातील सुमारे ८० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून काळेनगरच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.