नाशिक : तब्बल आठ गुन्ह्यात ग्रामिण पोलीसांना गुंगारा देणारा संशयीत शहर पोलीसांच्या जाळयात अडकला आहे. सिन्नर आणि निफाड पोलीसांच्या रेकॉर्डवरील संशयीतावर चैनस्नॅचिंगसह चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून त्यास सिन्नर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. किशोर अशोक धोत्रे (३५ रा.शांतीनगर झोपडपट्टी,अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. युनीट २ चे कर्मचारी योगेश सानप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सिन्नर आणि निफाड पोलीसांच्या तब्बल आठ गुह्यात ग्रामिण पोलीसांना गुंगारा देणारा संशयीत गरवारे पॉईंट भागात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळयात अडकला. त्याच्याविरोधात चैनस्नॅचिंगचे चार आणि मोटारसायकल चोरीचे चार असे आठ गुन्हे दाखल आहेत. मात्र तो मिळून येत नव्हता. संशयीतास सिन्नर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले,उपनिरीक्षक विजय लोंढे,पोपट कारवाळ,जमादार राजेंद्र जाधव,हवालदार राजाराम वाघ,यशवंत बेंडकुळी,शंकर काळे,संपत सानप,देवकिसन गायकर,सुगन साबरे,राजेंद्र घुमरे,सोमनाथ शार्दुल,पोलीस नाईक परमेश्वर दराडे,विजय वरंदळ,यादव डंबाळे,शिपाई गौरव गवळी आदींच्या पथकाने केली.