नाशिक – सिन्नर फाटा येथील सराईत गुंड बाबा शेख याची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांना पिस्तुल पुरविणाऱ्या सागर आहिरेला गुन्हेशाखेच्या युनिट एकने वर्षभरानंतर नांदगाव तालुक्यातील साकोरी येथून रविवारी अटक केली. २९ वर्षीय अहिरे हा एकलहरे रोडवरील अरिंगळे मळा येथे राहणार आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास डीजीपी नगर येथील साई मंदिराजवळ ही हत्या करण्यात आली होती.
वर्षभरापूर्वी झालेल्या या घटनेत सिन्नर फाटा येथे राहणारा कुख्यात गुंड बाबा शेख याच्यावर मुर्गी राजा आणि टीप्या या सराईतांनी एका साथीदाराच्या मदतीने गावठी कट्ट्याने पाठीत गोळी झाडल्या होत्या. त्यात बाबा शेख जखमी झाला. त्याला नंतर खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आले. पण, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पण, मृत्यूपूर्वी बाबा शेखने नातेवाईकांना हल्लेखोरांची नावे सांगितली होती. त्यानुसार उपनगर पोलिसांनी तपास करुन त्यांना अटक केली होती. तसेत गुन्ह्याचा तपास करुन पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांनी संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. मात्र बाबा शेखच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना गावठी कट्टा पुरविणारा सागर आहिरे एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक माणिक गायकर, हवालदार श्रीराम सपकाळ, नाईक संजय गामणे, संदीप पवार, शिपाई सचिन आजबे, मिलिंद बागुल यांना आहिरे हा नांदगावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करुन सागर अहिरेला नांदगाव तालुक्यातील साकोरी येथून अटक केली.