बांधकाम साईडच्या तिस-या माळयावरून पडल्याने कामगाराचा मृत्यु
नाशिक : नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईडच्या तिस-या माळयावरून पडल्याने ३४ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे टेकम रेखिराम पाटील (३४ मुळ रा.छत्तीसगड हल्ली दातीरनगर,अंबड) असे मृत कामगाराचे नाव आहे. एक्स्लो पॉईंट ते सिमेन्स कंपनी दरम्यान सुरू असलेल्या सुराज्य इमारतीच्या बांधकामावर टेकम पाटील काम करीत असतांना ही घटना घडली. बांधकामाच्या तिसºया मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने अन्य कामगारांनी त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
दुचाकीस्वारांनी लांबविले महिलेचे मंगळसूत्र
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या नणंद भावजयी पैकी एकीच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबडून नेल्याची घटना गंगापूररोड भागातील भोसला स्कूल समोर घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी प्रविण मोराडे (रा.श्रमिक कॉलनी,आकाशवाणी टॉवर जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोहिणी मोराडे व वर्षा मोराडे या नणंद भावजयी रविवारी (दि.२६) रात्री भोसला स्कूल समोरून जेहान सर्कलच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. भोसल्याच्या प्रवेशद्वारासमोर विरूध्द दिशेने येणा-या दुचाकीस्वाराने रोहिणी मोराडे यांच्या गळयातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.
वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या
नाशिक : शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी रविवारी (दि.२६) आत्महत्या केली. त्यात ८० वर्षीय वृध्दासह २५ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शिवराम राघो पगारे (८० रा.फुलेनगर पोलीस चौकी जवळ,पेठरोड) व बैयजू प्रमोद शर्मा (२५ रा. खेतवाणी लॉन्स सुरक्षा रक्षक रूममध्ये,उंटवाडी) अशी वेगवेगळया ठिकाणी आत्महत्या करणा-यांची नावे आहेत. शिवराम पगारे या वृध्दाने आपल्या राहत्या घरातील दुस-या मजल्यावर अज्ञात कारणातून लोखंडी जिन्याला मफलर बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत. दुसरी घटना उंटवाडी भागात घडली. बैयजू शर्मा नामक सुरक्षा रक्षकाने खेतवाणी लॉन्स सेंट्रल पार्क या बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील एका रूममध्ये अज्ञात कारणातून छताच्या हुकास पाणी मारण्याची प्लॅस्टीक नळीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी जयनारायण शर्मा यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.