महिलेवर अत्याचार
नाशिकः घरात जबदरस्तीने घुसून पतीस व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत एकाने महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्या प्रकरणी तब्बल वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयघोष तुकाराम जाधव (रा. बागुल कॉलनी, मालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ८ ऑगस्ट २०१९ ते २२ फेब्रुवारी २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. जाधव हा जबरदस्तीने पीडितेच्या घरात घुसून पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याने पीडितेवर अत्याचार केले. हा प्रकार फेब्रुवारी २०२० पर्यंत घडला. याप्रकरणी तब्बल वर्षानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार संशयितावर बलात्कार तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
….
अल्पवयीन मुलावर अत्याचार
नाशिकः १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर दोघांनी वर्षभरापासून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार दोघांवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल मराठे व त्याच्या गाडीवरील चालक (रा. पाचोरा, जि. जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पीडित मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार मराठे व त्याचा चालक हे जानेवारी २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत वेळोवेळी मुलाचे घर तसेच दुकानात येऊन त्यावर अत्याचार करत होते. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक पवार करत आहेत.
……
दुचाकी टपरीवर आदळून वृद्ध ठार
नाशिकः दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी लोखंडी बोर्ड तसेच टपरीवर आदळून झालेल्या अपघातात चालक वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना काठेगल्ली येथे शनिवारी (दि.८) रात्री घडली. प्रमोद छगनराव पाटील (६५, रा. समर्थनगर, तपोवन रोड, काठेगल्ली) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री पाटील हे त्यांची दुचाकी एमएच १५ एडब्लु ०१२४ वरून तपोवन रोडकडे जात असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी एका लोखंडी बोर्ड तसेच पुढे पत्र्याच्या टपरीवर जाऊन आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
……