नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश कायम असतांना विनापरवानगी विकास कामांचे उदघाटन करून गर्दी जमविल्याप्रकरणी सहा नगरसेवकांविरूध्द पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहे. त्यात तीन नगरसेविकांचा समावेश असून पश्चिम विधानसभा मतदार संघातील हे नगरसेवक आहेत. दिपक दातीर, डी.जी.सुर्यवंशी, सुवर्णा मटाले, प्रतिभा पाटील, भागवत आरोटे, मधूकर जाधव अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकास कामांचे उदघाटन आणि लोकार्पण सोहळयांचा धडाका सुरू झाला आहे. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी मनाई आदेश कायम आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी आणि उपस्थीवर मर्यादा आल्या आहेत. तरीही लोकप्रतिनीधींकडून त्याचे उल्लघंन होतांना दिसू लागले आहे. औद्योगीक वसाहतीतील प्रभाग क्र. २६ मधील वडारवाडी भागातील हॉटेल पंचरत्न मागे शनिवारी (दि.२५) शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख रस्ता कॉक्रेटीकरणाचे उदघाटन झाले तर प्रभाग क्र.२८ मधील महालक्ष्मीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर येथील पाण्याच्या टाकीचा रविवारी (दि.२६) लोकार्पण सोहळा पार पडला. या दोन्ही कार्यक्रमासाठी संबधीत नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप आहे. कोविड १९ च्या संसर्गामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल याची जाणीव असतांनाही त्यांनी महिला पुरूषांची गर्दी जमवून शासनाच्या सुचनांकडे आणि पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लघंन केल्याचे पोलीसांच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे आणि पवार करीत आहेत.