नाशिक – बांधकाम व्यावसायीकास महिलेने घातला २० लाखाचा गंडा
नाशिक : बांधकाम व्यावसायीकास कर्मचारी महिलेने २० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कोविड काळात सदनिका विक्रीतून परस्पर रकमा स्विकारून हा अपहार करण्यात आला असून ग्राहकांना थेट ताबा दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत महिलेस अटक करण्यात आली आहे. दिव्यानी मंगलचंद जैन (२८ रा.पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रसन्ना सायखेडकर (रा.त्र्यंबकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सायखेडकर यांचे वडिल सुभाष सायखेडकर हे बांधकाम व्यावसायीक असून विजय ललवाणी यांच्याशी त्यांची भागीदारी आहे. जय एन्टरप्रायझेस या फर्मच्या माध्यमातून मखमलाबाद येथील सर्व्हे नं. ४५ – २३४ वरील प्लॉट नं. २३ ते २७ या भूखंडावर साई रेसिडेन्सी नावाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या इमारतीतील २३ सदनिका आणि २ व्यापारी गाळे हे सायखेडकर यांच्या मालकीचे तर उर्वरीत सदनिका आणि गाळे भागीदार ललवाणी यांना देण्यात आल्या आहेत. सदर सदनिका आणि गाळे विक्री करण्यासाठी संशयीत महिलेची नेमणुक करण्यात आली असून महिलेने नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ या कोव्हीड काळात दहा ते बारा ग्राहकांचे येणारे पैसे कोटेशन प्रमाणे कंपनीला न भरता परस्पर रोख स्वरूपात स्विकारून सुमारे २० लाखाचा अपहार केला. तसेच कंपनीने लावलेली कुलपे तोडून सदनिकांचा ताबा ग्राहकांना दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाय.एस.माळी करीत आहेत.
….
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
नाशिक : सातपूर परिसरातील अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रूक्सा देवाधीश विश्वास (१७ रा. ज्ञानगंगा क्लासेस समोर, गणेश कृष्ण मंदिर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. रूक्सा विश्वास हिने गुरूवारी (दि.२३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले. मात्र मध्यरात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.