किराणा व्यावसायीकाचे कार्यालयाचे शटर, कुलूप तोडून सव्वा तीन लाख लांबविले
नाशिक : किराणा व्यावसायीकाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन लाख रूपयांची रोकड लांबविली. ही घटना स्वामी नारायण नगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश जवरीलाल घिया (रा.स्वामी नारायण नगर,पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घिया किराणा व्यापारी असून त्यांचे लुंगे मंगल कार्यालया जवळ नागेश एटरप्रायझेस नावाचे किराणा मालाचे गोडावून आहे. याच ठिकाणी त्यांचे कार्यालय असून गुरूवारी (दि.२३) अज्ञात चोरट्यांनी ऑफिसचे शटरचे कुलूप तोडून गल्यातील ३ लाख १२ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
कारमधून रोकडसह लॅपटॉप लांबविला
नाशिक : चालकाची दिशाभूल करून त्रिकुटाने कारमधील रोकडसह लॅपटॉप असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज हातोहात लांबविला. ही घटना वडाळारोड भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश हरिभाऊ लासुरे (रा.मानेकशा नगर,द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. लासुरे गुरूवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास वडनेर दुमाला येथून आपल्या घराकडे एमएच १५ सीएम ०५१२ या कारने जात असतांना ही घटना घडली. वडाळा रोडने ते प्रवास करीत असततांना नासर्डी पुला पुढील साहिल लॉन्स समोर दोन – तीन अनोळखी इसमांनी त्याना थांबविले. यावेळी भामट्यांनी पाठीमागील नंबर प्लेट मधून रक्त पडत असल्याचे सांगितल्याने ते कार थांबवून पाठीमागील डिक्कीच्या दिशेने गेले असता एका तरूणाने कारमधील बॅग काढून घेत पोबारा केला. बॅगेत ७५ हजाराची रोकड आणि लॅपटॉप असा सुमारे १ लाख २५ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.