नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून त्रिकुटाने घरात कुटूंबियास लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कामटवाडा गावात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत गुंजाळ,समाधान गुंजाळ आणि भिला गुंजाळ (रा. हनुमान मंदिरासमोर,कामठवाडा गाव) अशी मारहाण प्रकरणी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी शोभा नारायण गोसावी (रा.आई बंगला,हनुमान मंदिरासमोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. गोसावी कुटूंबिय सोमवारी (दि.२०) आपल्या घरात असतांना संशयीत त्रिकुटाने बेकायदा घरात घुसून जुन्या वादाची कुरापत काढून शोभा गोसावी यांच्यासह मुलगा समिर,पती नारायण,सून प्रतिभा यांना लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच मुलीस अश्लिल शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.