नाशिक : चॅप्टर केसच्या सुनावणी दरम्यान गोंधळ घालून पोलीसास धक्काबुक्की करणा-या तीघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना नाशिकरोड येथील कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग ४ कार्यालयात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफीउद्दीन कमरूद्दीन काझी (५२) रफीक शफीउद्दीन काझी (३०) व रिजवान शफीउद्दीन काझी (२५ रा.मगर चाळ,जेलरोड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी एसीपी कोर्टात सेवा बजावणारे पोलीस कर्मचारी प्रकाश तुंगार यांनी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग ४ यांच्या कोर्टात देवळाली कॅम्प पोलीस ठाणे कडील चॅप्टर केस क्रमांक ३१३ – २०२१ मधील सामनेवाले अक्षय प्रकाश साळवे व अन्य या प्रकरणात सीआरपीसी १०७ ची सुनावणी सुरू असतांना संशयीतांनी विनापरवानगी न्यायदान कक्षात प्रवेश करून गोंधळ घालत शासकिय कामात अडथळा आणला. यावेळी पोलीस कर्मचारी तुंगार यांनी संशयीतांना न्यायदान कक्षा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता संतप्त संशयीतांनी आरडाओरड,शिवीगाळ व घोषणाबाजी करून तुंगार यांच्याशी झटापटी केली. तसेच ढकलून देत न्यायालयाचा व तुंगार यांच्या शासकिय कामात अडथळा आणला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.