नाशिक : शहरात चैनस्नॅचर सक्रिय झाले असून दोन ठिकाणी पुन्हा चैनस्नॅचिंग झाली. वेगवेगळया भागातून पायी जाणा-या महिलाच्या गळयातील दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले असून याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवार कारंजा भागातील छाया मधुकर भागवत (५५ रा.गोरेराम गल्ली) या मंगळवारी (दि.२२) सायंकाळी गंगापूररोड भागात गेल्या होत्या. प्रसाद सर्कल जवळीन सोमेश्वर किराणा दुकाना समोरून त्या पायी जात असतांना विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे डोरले आणि सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत. दुसरी घटना सिडकोत घडली. याप्रकरणी त्रिमुर्ती अंबड लिंक रोड भागातील मंजिरी संतोष मांडोळे (२८ रा.६ वी स्किम) यांनी तक्रार दाखल केली आहे. मांडोळे या सोमवारी (दि.२०) रात्री मुलास सोबत घेवून नजीकच्या पाथर्डी फाट्याकडे जाणाºया मार्गावरील मेडिकल स्टोअर्स मध्ये औषधे खरेदीसाठी गेल्या होत्या. मुथूट फायनान्स समोरील बाजूने त्या पायी जात असतांना एचआयजी या इमारती समोर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.