नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागात राहणा-या चार जणांनी सोमवारी (दि.२०) कुठल्या तरी नैराश्यातून आत्महत्या केली. चौघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर,पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मखमलारोड भागातील सुदाम किसन ताकाडे (४७ रा.रूख्मीनी अपा.विठ्ठल रूख्मीनी मंगल कार्यालया जवळ) यांनी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. ताकाडे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तर अमित संजय डेमसे (२० रा.लक्षरंग अपा.रामवाडी) या तरूणाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून,अधिक तपास हवालदार माळोदे व पोलीस नाईक आहिरे करीत आहेत.
नाशिक पुणे मार्गावरील डिजीपीनगर भागात राहणारे तुषार बापुराव कुलकर्णी (४८) यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत. तर शालिमार भागातील अशोक पुंडलिक दराडे (५६ रा.कर्मचारी वसाहत,संदर्भ सेवा रूग्णालय) यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याबाबत कौशल्या दराडे यांनी दिलेल्या खबरीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.