अपहरण करून बेदम मारहाण
नाशिकः कार आडवी लावून अपहरण करत एकास बेदम मारहाण करून सोडून दिल्याचा प्रकार पंचवटीतील दहावा मैल येथे ९ एप्रिलला घडला होता. या प्रकरणी महिनाभराने शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी किरण भिला पाटील (रा. वक्रतुंडनगर दिंडोरी रोड, हल्ली अंमळनेर, जि. जळगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ९ एप्रिल रोजी पाटील हे नाशिकवरून धुळे येथे जाण्यासाठी खासगी वाहनातून प्रवास करत असताना रासबिहारी शाळेजवळ मारूती ८०० या गाडीतून आलेल्या चौघांनी चारचाकी आडवी लावून दोघांनी पाटील यांना खासगी वाहनातून बळजबरी उतरवून त्यांच्या चारचाकी गाडीत बसवले. त्या ठिकाणावरून त्यांचे अपहरण करून जानोरी जवळ घेऊन गेले. या ठिकाणी शिवीगाळ करत त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांचे पाय फॅक्चर करण्यात आले. तसेच त्यांना तेथेच टाकून संशयितांनी पलायन केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक एस. जी. पवार करत आहेत.
……