नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेल्या तडीपारास पोलीसांनी जेरबंद केले आहे. संशयीताच्या अंगझडतीत गावठी पिस्तूलसह जीवंत काडतुसे मिळून आले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
गणेश पंढरीनाथ धोत्रे (३६ रा.एरिगेशन कॉलनी,मखमलाबाद कॉलनी म्हसरूळ) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. धोत्रे याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केलेली असतांना तो राजरोसपणे शहरात वावरत असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच युनिट १ चे कर्मचारी प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. रविवारी (दि.१९) धोत्रे आपल्या घरी आला असल्याची माहिती मिळताच युनिटच्या पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे असा ३१ हजार ५०० रूपये किमतीचे अग्निशस्त्र मिळून आले असून त्यास म्हसरूळ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.