चेष्टामस्करीत लोटून दिल्याने एकाचा मृत्यु; एक जण अटकेत
नाशिक : चेष्टामस्करीत लोटून दिल्याने एकाचा मृत्यु झाला. ही घटना शिवाजीवाडी भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. विष्णू किसन पवार (३५ रा.शिवाजीवाडी,भारतनगर) असे तरूणास लोटून देत त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. या घटनेत संतोष विष्णू वांगाडे (३६ रा.मनपा शाळेजवळ,शिवाजीवाडी) यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी वांगाडे यांच्या पत्नी जया वांगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पवार गेल्या शनिवारी मनपा शाळा भागात गेले असता ही घटना घडली. वाळूच्या ढिगा-यावर बसलेल्या संशयीतास त्यांनी घरी गेला नाही का असे म्हणत दोघांमध्ये चेष्टामस्करी झाली. यावेळी संशयीताने जोरात धक्का दिल्याने वांगाडे जमिनीवर पडले होते. या घटनेत डोक्यास मार लागल्याने वांगाडे यांचा मृत्यु झाला. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी लाखाचा ऐवज चोरून नेला
नाशिक : वडाळा शिवारातील खोडेनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्या चांदीच्या अलंकाराचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद हबीब बेग (रा.अशोका मंगल अपा.हसन मस्जीद जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बेग कुटूंबिय गेल्या शनिवारी (दि.१८) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.