कारची काच फोडून चोरट्यांनी हॅण्डबॅग चोरली; अडीच लाख रूपयांची रोकड व महत्वाचे कागदपत्र लंपास
नाशिक : रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी हॅण्डबॅग चोरून नेली. या बॅगेत अडिच लाख रूपयांची रोकड होती. ही घटना वर्दळीच्या नेहरू गार्डन भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम नेवदराम दियालानी (रा.टागोरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दियालानी गेल्या शनिवारी (दि.१८) दुपारी शालिमार भागात गेले होते. सांगली बँक सिग्नल परिसरातील जगन्नाथ रेस्टॉरंट समोर त्यांनी आपली कार एमएच १५ ईआर ३१३३ पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या खिडकीची काच फोडून चालक शिटावर ठेवलेली हॅण्डबॅग चोरून नेली. बॅगेत अडीच लाख रूपयांची रोकड व महत्वाचे कागदपत्र होते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
दोन मोबाईल चोरीला
नाशिक : ग्राहक म्हणून आलेल्या भामट्याने हॉटेलच्या काऊंटरवरील दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना त्र्यंबकनाका भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून संशयीतास अटक केली आहे. निलेश नामदेव घुमाळे (३६ रा.रविवार पेठ) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश निकम (रा.कुबेरा हॉटेल,त्र्यंबकनाका) यांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या गुरूवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. कुबेरा हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरच्या ड्रावर मध्ये ठेवलेले सुमारे २० हजार रूपये किमतीचे मोबाईल ग्राहक म्हणून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. पोलीसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून संशयीतास अटक केली असून अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.