पार्क केलेल्या डंम्पर मधून चोरट्यांनी २२ हजाराचे डिझेल चोरले
नाशिक : पार्क केलेल्या डंम्पर मधून चोरट्यांनी डिझेल चोरून नेल्याची घटना महामार्गावरील शहिद खैरनार पेट्रोल पंप भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास भिमराव जाधव (रा.गणपतनगर,नांदूरगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांचा मालकिचा एमएच १५ एचएन ५४९९ हा डम्पर रविवारी (दि.१९) शहिद खैरनार पेट्रोल पंपा समोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेला असतांना ही घटना घडली. प्रवासात झोप लागल्याने चालक चाधव यांनी आपल्या ताब्यातील डंम्पर रस्त्याच्या कडेला पार्क करून ते कॅबिनमध्ये झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी टाकीचे झाकण आणि सेन्सॉर लॉक तोडून त्यातील सुमारे २२ हजार रूपये किमतीचे डिझेल चोरून नेले. अधिक तपास हवालदार वाढवणे करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसुत्र आणि सोनसाखळी ओरबडले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसुत्र आणि सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मोदकेश्वर मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमा नरेंद्र पराडकर (रा.चार्वाक चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पराडकर या रविवारी (दि.१९) रात्री गणपती दर्शनासाठी मोदकेश्वर मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या घराकडे निघाल्या असता मंदिराजवळच समोरून येणा-या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील मंगळसुत्र आणि सोनसाखळी असा २५ हजार रूपये किमतीचे दागिणे हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
वडाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या
नाशिक : संतकबीरनगर येथील वडाच्या झाडाला गळफास लावून एकाने आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कैलास उर्फ सोमनाथ अशोक थोरात (४२ रा.भोसला स्कूल मागे,संतकबीरनगर) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. थोरात याने रविवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास परिसरातील पाटा लगतच्या वडाच्या झाडाच्या फांदीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
…