महिलेचा विनयभंग कारचालकास अटक
नाशिक : व्हिडीओ काढण्याचा जाब विचारत असतांना एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना वर्दळीच्या शरणपूर रोड भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी कारचालकास अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार धनंजय पिंगळे असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. शुक्रवारी (दि.१७) पीडित महिला आपल्या मुलास घेण्यासाठी कार घेवून शरणपूर रोड भागात गेली होती. मुलास घेवून ती आपल्या कारमध्ये बसत असतांना ही घटना घडली. शेजारी पार्क केलेल्या एमएच १५ जेआर ८७९३ कारमधील चालक मोबाईलवर आपले चित्रीकरण करीत असल्याचे लक्षात येताच महिला त्यास जाब विचारण्यासाठी गेली असता संशयीताने तिचा विनयभंग केला. शुटींग का करीत आहेस असे म्हणत महिला त्याच्या कारच्या दिशेने गेली असता त्याने तुमच्या कारची नंबर प्लेट तुटलेली असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने त्याच्या वाहनाची चावी काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने विनयभंग केला. पोलीसांनी संशयीतास अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अशोक काकविपुरे करीत आहेत.
मालट्रकसह दोन दुचाकी चोरी
नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून, मालट्रकसह दोन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून,चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित चमनलाल चौधरी (रा.इंद्रकुंड, पंचवटी कारंजा) यांचा मालट्रक एमएच १५ डीके ०९९२ गेल्या रविवारी (दि.१२) तपोवन कॉर्नर येथील भारत गॅस गोडावून जवळील सर्व्हीस रोड लगत पार्क करून ठेवलेला असतांना चोरट्यांनी तो चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाथरे करीत आहेत. दुसरी घटना भद्रकालीतील भाजी मार्के ट भागात घडली. गंगापूर गावातील समिना जाकिर खान या कामानिमित्त शहरात आल्या होत्या. बजरंग व्यायाम शाळा परिसरात अॅक्टीव्हा एमएच १५ एफपी ४६०४ पार्क करून त्या भाजी मार्केट मध्ये गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची अॅक्टीव्हा चोरून नेली. ही घटना गेल्या सोमवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बोंबले करीत आहेत. तर औरंगाबाद रोड भागातील राहूल सोमनाथ बुनगे (रा. माडसांगवी) यांची एमएच १५ ईडब्ल्यू २४७४ दुचाकी मंगळवारी (दि.१४) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.