आडगावला बेकायदा दारू विक्री; विक्रेता गजाआड
नाशिक : आडगाव येथील राजवाड्यात बेकायदा देशी दारू विक्री करणा-या एकास पोलीसांनी रंगेहात पकडून अटक केली. संशयीताच्या ताब्यातून मद्यसाठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम भास्कर जाधव (४७ रा.राजवाडा आडगाव) असे संशयीत दारू विक्रेत्याचे नाव आहे. आडगाव येथील राजवाड्यात बेकायदा मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१७) पोलीसांनी छापा टाकला असता संशयीत मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून १८० मिलीच्या १२ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलीस शिपाई विनोद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
….
शहरात दोघांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून शुक्रवारी (दि.१७) वेगवेगळ््या भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यात ६९ वर्षीय वृध्दासह ३२ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. दोघांच्याही नैराश्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार भास्कर भिमा धोंडगे (रा.रेणूका रो हाऊस,नरहरीनगर पाथर्डी फाटा) यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून आड्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत. दुसरी घटना विहीतगाव येथे घडली. श्रीराम भिकाजी भोर (३२ रा.रंगोली सोसा.विहीतगाव) या तरूणाने गुरूवारी (दि.१६) मध्यरात्री आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही घटना निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.