नाशिक : शहरात पुन्हा चैनस्नॅचर सक्रिय झाले असून गुरूवारी (दि.१६) वेगवेगळय़ा भागात दोन महिलांच्या गळयातील अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. त्यात एक दुचाकीस्वार महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव आणि उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मखमलाबाद नाका भागातील लक्ष्मी नितीन तागड (रा.उदय कॉलनी) या गुरूवारी टाकळी येथे गेल्या होत्या. तपोवनरोडने त्या दुपारीच्या सुमारास आपल्या घरी स्कुटीवर परतत असतांना ही घटना घडली. लक्ष्मीनारायण मंदिर चौकाकडून त्या केवडीबन कडे जाणा-या मार्गाने स्कुटीवर प्रवास करीत असतांना पाठीमागून शाईन दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सोनसाखळी आणि गंठण असा सुमारे १ लाख ४० हजार रूपये किमतीचे दागिणे ओरबाडून नेले. विशेष म्हणजे हॉर्न मारत आलेल्या भामट्यांनी जवळ येत ओळख असल्याचे भासवून काही कळण्याच्या आत अलंकार हिसकावत कन्नमवार पुलाच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. उषा सदाशिव तेजाळे (६३ रा.पुष्पकनगर,लोखंडेमळा) या वृध्देने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तेजाळे या सैलानी बाबा रोडवरील एका लॅब मध्ये शुगर चेक करण्यासाठी पायी जात असतांना ही घटना घडली. विठ्ठल मंगल कार्यालया समोरील हनूमान मंदिरा बाहेर त्या देवदर्शन घेण्यासाठी थांबल्या असता ही घटना घडली. समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ९५ हजार रूपये किमतीचा सोन्याचा गोफ खेचून टाकळीरोडच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.