सिध्दीविनायक कॉलनीत दोघांची दहशत; एकास मारहाण करीत चारचाकी वाहने फोडली
नाशिक : दहशत निर्माण करीत दुकलीने एकास बेदम मारहाण करीत चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान केल्याची घटना अंबड गावातील सिध्दीविनायक कॉलनीत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी दोघा संशयीतांना अटक केली आहे. अक्षय इंगळे (रा.गुरूगोविंद कॉलेज समोर,सराफनगर) व तन्मय पाटील (रा.रूचित अपा.राजीवनगर) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी राहूल दादाजी चव्हाण (रा.सिध्दीविनायक कॉलनी,अंबड) यानी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.१५) ही घटना घडली. दोघा संशयीतांनी चव्हाण यांना गाठून कुठलेही कारण नसतांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच चव्हाण यांच्या मालकीच्या स्विफ्ट डिझायर व मारूती एस स्टार आणि किरण पाटील यांच्या मालकीची हुंडाई कारच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अंबड औद्योगीक वसाहत गुन्हेगारी अड्डा बनला असून, वेगवेळय़ा भागात टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्यासाठी नाहक मारहाण आणि वाहनांची तोडफोड केली जात आहे. भाईगिरी गाजविणा-या टोळक्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कामगार आणि जनतेकडून होवू लागली आहे.
.
महापालिकेचे वाचनालय चोरट्यांनी फोडले
नाशिक : महापालिकेचे वाचनालय चोरट्यांनी फोडल्याची घटना आयोध्यानगर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सरकारी ऐवजावर डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा सोपान सोनार (रा.सिंधी कॉलनी,उपनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनार या वाचनालयात कार्यरत आहेत. कोव्हिड – १९ या महामारीमुळे गेली अनेक महिने बंद असलेले कार्यालय गुरूवारी (दि.१६) त्यांनी उघडून बघीतले असता चोरीचा प्रकार समोर आला आहे. वाचनालयात शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सरकारी कागदपत्र आणि वस्तू चोरून नेल्या. त्यात लहान मुलांचे हजेरी आणि सकस आहार रजिस्टर व्हिजीट बुक,खेळणी आदी ऐवजाचा समावेश आहे. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.