मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदला बदल, २० हजाराला गंडा
नाशिक : मदतीच्या बहाण्याने भामट्याने एटीएम कार्डची अदला बदल करून एकाच्या बँक खात्यातील २० हजाराची रोकड लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहानू रामभाऊ ठोंबरे (रा.वृंदावननगर,जत्रा हॉटेल ते नांदूरनाका लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठोंबरे बुधवारी (दि.५) दुपारी नाशिकरोड भागात गेले होते. नाशिक पुणे रोडवरील फेम सिग्नल येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले असता ही घटना घडली. पैसे काढत असतांना भामट्याने मदतीचा बहाणा करून त्यांच्या हातात दुस-याचे एटीएम कार्ड ठेवून कार्ड लांबविले. यानंतर त्याच्या कार्डचा वापर करून भामट्याने बँक खात्यातील परस्पर काढून घेतली. ही बाब मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर समोर आली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.
…….
वाद मिटविणा-या तरूणावर चाकू हल्ला
नाशिक : भांडणात वाद मिटविण्यासाठी गेलेल्या एकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना द्वारका परिसरातील टॅक्टर हाऊस भागात घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून, याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाप्या उर्फ इम्रान व त्याचे दोन साथीदार अशी संशयीताची नावे आहेत. याप्रकरणी बब्बू राजमोहम्मद शेख (रा.नानावली,जुने नाशिक) या युवकाने तक्रार दिली आहे. बब्बू शेख गुरूवारी (दि.६) रात्री मित्र सद्दाम शेख याच्या समवेत टॅक्टर हाऊस भागात गेले असता ही घटना घडली. पाप्या उर्फ इम्रान याने बोलविल्याने सद्दाम त्यास घेवून गेला होता. यावेळी पाप्या उर्फ इम्रान याने बब्बू शेख यास का घेवून आला यावरून वाद घालत मित्र सद्दाम यास त्रिकुटाने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे बब्बूने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता संतप्त पाप्याने आपल्या जवळील धारदार चाकूने बब्बू शेख याच्या कमरेवर वार केले. या घटनेत शेख जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.
…….