कोरोना महामारीत शासन नियमांची पायमल्ली; रामालयम हॉस्पिटलवर गुन्हा
नाशिक : कोरोना महामारीत शासन नियमांची पायमल्ली करणा-या रूग्णालयांना महापालिकेने रडारवर घेतले असून,जागा उपलब्ध नसल्याच्या नावाखाली रूग्णांची पिळवणुक करणा-या रूग्णालयांना वर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मनपाच्या तक्रारीवरून रामालयम हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांवर साथरोग प्रतिबंध,आपत्ती व्यवस्थापन आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध जागेची माहिती न दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात उपचारा अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. रूग्णालयांकडून जागेच्या नावाखाली लुट करण्यात येत असल्याचा आरोप झाल्याने संबधीत आस्थापनांनी उपलब्ध जागेची माहिती महापालिका तसेच संबधीतांना कळविणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील सर्वच हॉस्पिटलकडून माहिती मागविली होती. मात्र रामालयम हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. शोधन गोंदकर यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. उपलब्ध खाटा आणि रूग्णांची माहिती देणे बंधनकारक असतांना त्यांनी मनपाच्या नोटीसाही स्विकारल्या नाहीत. चौकशी अंती मनपाच्या वतीने डॉ.विजय देवकर यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.
……
तडीपार बाबर पठाण जेरबंद
नाशिक : हद्दपार कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणाºया तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. गंजमाळ येथील श्रमिकनगर भागात शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबर हुसेनखान पठाण (५६ रा.श्रमिकनगर,पंचशिलनगर) असे अटक केलेल्या संशयीत तडिपाराचे नाव आहे. पठाण याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना युनिट १ पथकाच्या हाती तो लागला. पठाण श्रमिकनगर येथील गॅस गोडावून भागात असल्याच्या माहितीवरून गुरूवारी (दि.१६) पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले. याप्रकरणी युनिटचे कर्मचारी कविश्वर खराते यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.