जुगार खेळणा-या पाच जुगारींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : फुलेनगर येथील पाटालगत उघड्यावर जुगार खेळणा-या पाच जुगारींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत पत्यावर तिरट नावाचा जुगार खेळत होते. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज मंगल संकपाळ,गौरव अशोक मोतीयानी,संदिप रघूनाथ आहिरे,विजय विनोद भालेराव व जयेश रामदास गुंबाडे (रा.सर्व फुलेनगर) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. मंगळवारी (दि.१४) रात्री पाटाच्या किनारी असलेल्या शेषराव मंदिराच्या पाठीमागील पत्र्याच्या आडोशाला काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता संशयीत पोलीसांच्या जाळयात अडकले. उघड्यावर संशयीत पत्यांवर तिरट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून पोलीस कर्मचारी अरूण भोये यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सानप करीत आहेत.
शहरात वावर ठेवणा-या तडीपारास अटक
नाशिक : हद्दपार कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत भारतनगर येथील आपल्या घरात मिळून आला. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम आयाज काझी (२८ रा.जुनी म्हाडा वसाहत,भारतनगर) असे अटक केलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. काझी याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना युनिट १ पथकाच्या हाती तो लागला. काझी आपल्या घरात असल्याच्या माहितीवरून बुधवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले. याप्रकरणी युनिटचे कर्मचारी रविंद्र बागुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपा हवालदार राजू टेमगर करीत आहेत.