दुचाकीच्या डिक्कीतून चोरी; रोकडसह सोन्याचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : घरासमोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिणे आणि महत्वाचे कागदपत्र चोरून नेल्याची घटना सिडकोत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताई त्र्यंबक पगार (रा.मटाले मंगल कार्यालय मागे,कामटवाडा रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ताई पगार या बुधवारी (दि.१५) कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या घरी परतल्या असता ही घटना उघडकीस आली. घरासमोर पार्क केलेल्या स्कुटीस (एमएच १५ इएफ ३३४३) चावी राहिल्याने अवघ्या काही वेळातच त्या पुन्हा दुचाकीजवळ आल्या असता चोरीचा प्रकार समोर आला. अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतील हॅण्ड पर्स चोरून नेली. पर्स मध्ये १० हजाराची रोकड,मोबाईल, सोन्याचे दागिणे आणि महत्वाचे कागदपत्र असा सुमारे २८ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस नाईक शिरोले करीत आहेत.
शिंगवे बहुला येथे विषारी औषध सेवन करून केली एकाने आत्महत्या
नाशिक : शिंगवे बहुला (आंबेवाडी) येथील ४२ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल कचरू चौधरी असे मृत इसमाचे नाव आहे. चौधरी यांनी बुधवारी (दि.१५) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. प्रथमोपचारानंतर भाऊ दत्तू चौधरी यांनी त्यांना अधिक उपचारार्थ कॅन्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.