नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने वेगवेगळया ठिकाणी घेवून जात २५ वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला गर्भवती राहिल्याने संशयीताने टाळटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून या घटनेत संशयीताच्या पित्यानेही शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पुत्राविरोधात बलात्कार तर पित्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन खैरनार व नानाजी खैरनार (रा.दोघे श्रमिकनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत पितापुत्राचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प भागातील २५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या पतीचे निधन झाले असून संशयीत सचिन खैरनार याने पीडितेशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखविल्याने ती त्याच्या प्रेमात पडली होती. एप्रिल ते ऑगष्ट २०२१ दरम्यान संशयीताने महिलेस राहते घरी, सुखदेवनगर पाथर्डी फाटा तसेच संसरी गाव आणि देवळाली कॅम्प भागात घेवून जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. याच काळात महिला गर्भवती राहिली असता संशयीताने तिला शिवीगाळ व मारहाण करीत ऑबर्शन करण्याचा आग्रह धरला. मात्र महिलेने त्यास नकार दिल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून त्याच्या संशयीत पित्यानेही पैश्यांचे आमिष दाखवून शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.